अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा: खुर्च्यांची फेकफाक
40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावती: Amravati राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच दर्यापूर मतदारसंघात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले Ramesh Bundele यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खल्लार येथे मोठा राडा झाला. शनिवारी रात्री सभा संपल्यानंतर नवनीत राणा परत जात असताना काही अज्ञात गटांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यामुळे खल्लार गावात तणाव निर्माण झाला.
सभेवेळी उपस्थित काही व्यक्तींनी खुर्च्यांची फेकफाक करून गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर काहींनी नवनीत राणा यांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि थुंकण्याचा प्रयत्न केला. एका जमावाने त्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत या खुर्च्या अडवल्या. या गोंधळात युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर काही पदाधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
गोंधळानंतर संतप्त कार्यकर्त्यांसोबत नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन तासांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 30 ते 40 अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. मात्र, आरोपींची त्वरित अटक न झाल्यास अमरावती जिल्ह्यातील सर्व हिंदू खल्लारमध्ये येऊन धडक देतील, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.
या प्रकारामुळे खल्लार आणि परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस याप्रकरणी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान सुरक्षेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे.

