अवैध गुटखा आणि एर्टिगा कारसह १३ लाखांचा माल जप्त; मोर्शी पोलीस व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

TV Marathi News
0

 

अवैध गुटखा आणि एर्टिगा कारसह १३ लाखांचा माल जप्त; मोर्शी पोलीस व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई 




प्रतिनिधि,कासिम मिर्झा | 

चांदुरबाजार | दि. २० जुलै २०२५


अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरात अवैध गुटख्याच्या तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मोर्शी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत तब्बल १३ लाख २१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक एर्टिगा कार जप्त केली आहे.


ही धडक कारवाई १९ जुलै रोजी करण्यात आली. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद (IPS) यांच्या सूचनेवरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही मोहीम आखली होती.



गुन्हे शाखेचे पथक मोर्शी-वरुड रस्त्यावर मालू नंदी पुलाजवळ गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की काळ्या रंगाच्या एर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणला जात आहे. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी ही कार अडवून झडती घेतली असता, गाडीमध्ये प्रतिबंधित व सुगंधित गुटख्याचा साठा सापडला.




वाहनात दोन आरोपी होते. त्यातील चालकाने आपले नाव हाफिज खान साहेब खान (वय ४२, रा. माहूली जहागीर) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून ३ लाख ७१ हजार २५० रुपयांचा गुटखा, आणि ९ लाख ५० हजार रुपयांची एर्टिगा कार पोलिसांनी जप्त केली. एकूण १३,२१,२५० रुपये किंमतीचा माल पोलिसांच्या ताब्यात आहे.


दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पीएसआय विशाल रोकडे, संतोष तेलंग, राजेश कासोटे, मारोती वैद्य, रमेश मुंडे, प्रदीप ईपर, चालक किशोर सुने, तसेच मोर्शीचे ठाणेदार सुरज बोंडे व डीबी पथक यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.


पोलिसांच्या या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील गुटखा तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा अवैध कारवायांवर पोलिसांचा वचक कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


🌐 अधिक अपडेट्ससाठी वाचा — [www.TvMarathiNews.in]


(http://www.tvmarathinews.in)



 रिपोर्ट: कासिम मिर्झा | अमरावती

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)