लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी नवीन गाळणी, २.६३ लाख महिलांवर संक्रांत! फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?

TV Marathi News
0

 लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी नवीन गाळणी, २.६३ लाख महिलांवर संक्रांत! फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?


मुंबई: राज्यातील गाजलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्रतेची आता अधिक काटेकोर तपासणी केली जाणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या मदतीने या योजनेतील महिलांच्या उत्पन्नाचा अहवाल तयार केला जात असून, अंतिम अहवाल आल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.


महिला व बालविकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, सध्याच्या लाभार्थ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. विभागाने त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवायचा आहे. आठवडाभरात हा अहवाल येणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतरच फेब्रुवारीचा हप्ता जारी करण्यात येईल.



महायुती सरकारची 'गेम चेंजर' योजना


राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होतात. मात्र, सरकारच्या निदर्शनास आले आहे की, काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी ही नवीन गाळणी लावण्यात आली आहे.


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र, आता सरकारकडून आणखी एक तपासणी सुरू झाली असून, त्यात २.६३ लाख महिलांची पात्रता नव्याने तपासली जात आहे.


फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का?


महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाकडे पात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी पाठवली आहे. या यादीत आधार कार्ड व इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे. यासंदर्भातील पत्र जवळपास पंधरा दिवसांपूर्वी पाठवण्यात आले असून, या तपासणीच्या आधारावरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.


फेब्रुवारीचा हप्ता पात्र महिलांना दिला जाणार असला तरी अंतिम अहवालानंतरच अधिकृत लाभार्थ्यांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे योजनेशी संबंधित महिलांनी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)