अचलपूर ग्रामीण भागात 'ऊर्जा मित्र दिन' उपक्रम उत्साहात, असदपूर व कविठा ग्रामपंचायतीत वीज समस्यांवर मोकळी चर्चा
अचलपूर प्रतिनिधी।
https://youtu.be/upJVwaN6MnA
महावितरण कंपनीतर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी राबविण्यात येणाऱ्या 'ऊर्जा मित्र दिन' उपक्रमाअंतर्गत अचलपूर महावितरण उपविभाग सिटी-1 अंतर्गत असदपूर व कॅम्प उपविभाग अंतर्गत कविठा ग्रामपंचायतीत वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच महावितरणचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असदपूर ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश राठोड यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या वीज समस्यांबाबत खुलेपणाने मांडणी करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्या समस्या सोडविणे शक्य होईल. यानंतर सहायक अभियंता राजेश गवळी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
तसेच कॅम्प उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश बोरीकर यांनी कविठा ग्रामपंचायतीत सभा घेऊन वीज समस्यांवर चर्चा केली. वीजपुरवठा, खांबांची दुरुस्ती, जळालेले ट्रान्सफॉर्मर, कमी व्होल्टेज आदी समस्यांबाबत ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मांडल्या, त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महावितरणच्या 'ऊर्जा मित्र दिन' उपक्रमामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना गावातच अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत आहे. यामुळे तक्रारींवर तातडीने कार्यवाही होत असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
यावेळी असदपूर ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन मुंदाणे व कविठा ग्रामपंचायतीचे सरपंच बाबा साकूम यांनी महावितरणच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वीज समस्यांपासून दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी असदपूरचे सहायक अभियंता राजेश गवळी, सहायक अभियंता रजत राऊत, तोडगाव वितरण केंद्राचे कर्मचारी सचिन खरड, राहुल ठाकरे, प्रणव आगरकर, राजेश वैराळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी महावितरणच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.


